या वर्षीच्या अतिवृष्टीने डाळिंब उत्पादनात तब्बल ५० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. देशभरात सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्रावर डाळिंब घेतले जाते. त्यापैकी जवळपास एक लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाचा मृग बहर घेतला जातो. या वर्षी मात्र मृग बहराच्या २० हजार हेक्टर क्षेत्रावरच चांगल्या बागा आहेत. त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे. महत्त्वाचे म्हणजे डाळिंबाला सध्या १०० रुपये प्रतिकिलो असा दर मिळत असला, तरी शेतकऱ्यांच्या बागेत चांगले डाळिंबच दिसून येत नाहीत. हा डाळिंब उत्पादकांना मोठा फटका आहे. डाळिंबाची निर्यातही सुमारे २५ हजार टनांनी घटण्याची शक्यता आहे. खरे तर वातावरण बदलाच्या या काळात मागील दशकभरापासून डाळिंब पीक संकटात आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, अवकाळी पावसाने डाळिंब शेतीचे नुकसान होत आहे. सातत्याचे ढगाळ वातावरण, तापमान-थंडीत होणारे मोठे चढ-उतार अशा परिस्थितीत बहारनिहाय बागेचे नियोजन शेतकऱ्यांना फारच जिकिरीचे ठरत आहे. मागच्या वर्षीदेखील अवकाळी पावसाने डाळिंब शेतीचे खूप नुकसान केले. यावर्षी लॉकडाउनमुळे देशांतर्गत आणि विदेशी बाजारपेठा ठप्प होत्या. त्यातच सुरुवातीच्या चांगल्या पाऊसमानामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने मृग बहर धरला, तर सप्टेंबर-ऑक्टोबरच्या अतिवृष्टीने हा बहरच उद्ध्वस्त करण्याचे काम केले.